कांदे पोहे!
कांदे पोहे, आपल्या महाराष्ट्रीयन लोकांच्या अति परीचयातील पदार्थ. विवाह जूळवतांना पुर्वी हमखास केला जाणारा पदार्थ. तर माझ्या सारख्या मुळच्या नाशिकमधील मात्र शिक्षण आणि नोकरीच्या निमित्त्याने पुण्यातील पेठांमध्ये बरेच काळ वास्तव्य केलेल्या व्यक्तींचा रोजच्या जगण्याची सुरवात करणारा पदार्थ. सहजतेने पाच मिनीटात तयार होणारा हा पदार्थ .सध्या बाजारात कांद्यांचे आणि शेगदाण्याचे भाव किती आहेत याचा बातम्या न बघता, बाजारात न जाता अत्यंत खराखुरा वृत्तांत सादर करणारा खाद्यपदार्थ म्हणजे कांदेपोहे. आपल्या चित्रपटसृष्टीत, साहित्य विश्वात कांदेपोहे हा मोठा विषय आहे.सनई चौघडे या मराठी चित्रपटात तर आयुष्य म्हणजे कढईतील करपलेले कांदेपोहे असे सांगत, कांदे पोह्यांना आयुष्यातील भल्याबुऱ्या प्रसंगाशी जोडण्यात आले आहे. महाराष्ट्रात कधीही नाश्त्यासाठी मिळणारा पदार्थ म्हणजे कांदेपोहे.
तर गरमागरम कांदेपोहे आणि त्यावर लिंबू पिळल्यावर असे कांदेपोहे खाणे हणजे रस्त्यावरचे स्वर्गसुख म्हणता येईल. मात्र काही कारणाने आपल्या महाराष्ट्रात सध्या या कांदा पोह्यांची वाट लावण्याचे कार्य मोठ्या जोमाने सुरु असल्याचे दिसून येत आहे. कांदेपोह्यावर शेव काय विविध रस्से काय जे जे टाकता येईल, असे खाद्यपदार्थ टाकुन मुळच्या कांदे पोह्यांची चव बिघडवण्याचे कार्य मोठ्या पद्धतशीरपणे सुरु आहे चवदार कांदे पोहे मात्र पुर्णत: बेचव होत आहेत याकडे कोणाचे लक्षच नाहीये.किंबहुना लक्षात येवून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.असे म्हणा हवे तर.
पुर्वीच्या काळी विवाह ठरवताना वराकडील मंडळी वधूपरीक्षेसाठी नवऱ्या मुलीच्या घरी आले असता मुलीला स्वयंपाक करता येतो का, याची चाचपणी ही कांदेपोहे कसे तयार केले आहेत यावरून करण्यात येत असे.आजकाल ही पद्धत फारसी प्रचलीत नाही,पण या पद्धतीचे पुन्हा पालन करणे सुरु झाल्यास, या नव्या पद्धतीने कांदेपोहे तयार केल्यास मुळातील कांदेपोह्यांची चव ती काय, हे न समजल्याने मुलांकडील मंडळींची फसगत होण्याचीच शक्यता अधिक.
कांदे पोहे या खाद्यपदार्थाला मराठी विनोदी साहित्यात जे स्थान आहे ते देखील जून्या पद्धतीच्या कांदे पोह्यांना, ते बिघडले यावरुन मराठीत विनोद निर्मिती झालेली आढळते आता नव्या कांदे पोह्यांत चव बिघडली तरी काही फरक पडत नाही कारण वरुन इतके पदार्थ टाकले जातात की, मुळचे पोहे बिघडले आहेत,हेच कोणाच्या लक्षात येत नाही त्यामुळे ते सुधारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.त्यामुळे यातून होणाऱ्या विनोदनिर्मिती काहीसा ब्रेक लागला आहे आता मराठीत विनोदी लेखकांना नवा पदार्थ शोधावा लागेल . हिंदीतील एक महत्त्वाची विनोदी मालिका असलेल्या तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील आत्माराम भिडे यांच्या तोडीं असलेल्या एका वाक्याचा आधार घेत बोलायचे असल्यास, कांदेपोहे तो हमारे जमानें में बनते थे! असे म्हणण्याची वेळ तर येणार नाही ना, असे आजचे कांदेपोहे बघून वाटते.कांदे पोह्याची मुळ चव कायम रहावी,त्यात मुळचा स्वाद पुर्णत:बदलला जावा, इतके बदल होवू नये.असे मागणे देवाकडे करत सध्यापुरती आपली रजा घेतो, नमस्कार.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा